स्नेहांकिताचे पुढचे पाऊल

  1. दिनांक ५ मार्च २०१६ हा स्नेहांकिताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय दिवस आहे. संस्थेच्या ४० वर्षाच्या कालावधीत प्रथमच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संस्थेने ज्ञातीबाह्य समाजासाठी काही करण्याचे निर्णय घेतला.संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला दळवी यांनी २०१५च्या विलेपार्ले येथील शिबिरात आपले मनोगत सांगताना हा विचार सभागृहात मांडला व त्याला उत्तम प्रतिसाद मिळून संस्थेच्या पदाधिकार्यांनी सहकार्य केल्यामुळे या उपक्रमास चालना मिळाली आणि ज्ञातीबाह्य समाज सेवेकडे संस्थेचे पहिले पाऊल पडले.चंद्रावर पहिले पाऊल टाकल्यावर “नील आर्मस्ट्रोन्गला” जितका आनंद झाला असेल तेवढाच आनंद आमच्या सर्व भगिनींच्या चेहऱ्यावर ओसंडत होता.
  2. डॉ. विनोदिनी प्रधान संस्थेच्या जेष्ठ सदस्या यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल येथील नेरे गावातील शांतीवन येथील कुष्ठरोग निवारण समितीच्या आश्रम शाळेस दिनांक ५ मार्च २०१६ रोजी भेट दिली.या भेटीत स्नेहांकिताच्या सर्व संलग्न संस्थांमधील २६ भगिनींचा सहभाग होता. स्नेहांकिता तर्फे रुपये११०००/-ची देणगी ‘ बलवंतराय मेहता पंचायत राज जागृती केंद्रास’ देण्यात आली.एकूण देणगी पैकी गोशाळेतील गाईंसाठी पशुखाद्य योजनेंतर्गत रु.२०००/-, विद्यार्थी विकास निधी योजना रु.४०००/- व विद्यार्थी मध्यान्ह भोजन योजनेसाठी रु.५०००/- अशा प्रकारे विनियोग करण्यात आला.
  3. स्नेहांकिता संस्थेचा आर्थिक आढावा घेऊन संस्थेच्या विश्वस्त श्रीमती जयलक्ष्मी गुप्ते यांनी या कार्यासाठी संस्था रु.१००००/-पर्यंत देणगी देऊ शकते असे सांगितले होते त्यांत ‘श्री चैत्रावाली’ संस्थेने रु.१०००/- देणगी देऊन स्नेहांकिताच्या देणगीत भर घालून रु.११००० ची देणगी देण्यास सहाय्य केले. ह्या देणगीचा धनादेश कुष्ठरोग निवारण समितीच्या कार्यकारी विश्वस्त व अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आदिवासी आश्रमशाळेच्या अध्यक्षा श्रीम. रक्षा मेहता यांना स्नेहांकिता अध्यक्षा श्रीम.उज्ज्वला दळवी आणि संस्थेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
  4. या व्यतिरिक्त ‘स्नेहश्री महिंला मंडळ’,पनवेल यांनी संस्थेस ५ किलो साखर दान केली तर अनेक भगिनींनी स्वेच्छेने आर्थिक सहाय्य केले.
  5. आश्रम शाळेत भेट दिली तेव्हा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आश्रमशाळेतील मुलांनी स्नेहांकिताचे स्वागत केले.एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते कि त्या मुलांनी विविध प्रकारच्या टाळ्या वाजवून आमचे स्वागत केले. खरोखरच मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या टाळ्या आजवर कधीच अनुभवल्या नव्हत्या.घरापासून दूर आश्रम शाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनाला आनंद देणारे असे नृत्याविष्कार सादर केले त्या मुलांचे निरागस, आनंदी चेहरे पाहून तसेच शिस्तबद्धता पाहून गुरुकुल शिक्षण पद्धतीचे स्मरण झाले.या मुलांना घडविणाऱ्या शिक्षकांचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटण्याचे शिक्षकांनी जणू काही व्रतच घेतले आहे.
  6. स्नेहांकिता तर्फे आश्रमशाळेतील ४५० विद्यार्थ्यांना मध्यान्हाचे भोजन देण्यात आले .सर्व विद्यार्थ्यांना स्नेहांकिताच्या भगिनींनी स्वतःच्या हस्ते भोजन वाढले .हे कार्य करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होताच पण आम्हा सर्व भगिनींना सुद्धा विलक्षण असे समाधान मिळाले .रांगेत येणाऱ्या मुली त्यानंतर मुले,आपापली ताटे घेऊन शिस्तीत रांगेत जावून बसत होती. प्रत्येक कृतीतून त्यांना दिले जाणारे शिक्षण किती दर्जेदार आहे याची प्रचीती येत होती.
  7. आत्तापर्यंत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या स्नेहांकिता ने उचललेले हे पुढचे पाऊल सामाजिक बांधिलकीची कायम जाणीव ठेवून समाज साक्षर करण्यासाठी योगदान देत राहील याची खात्री वाटते .

सौ. उज्ज्वला दळवी

अध्यक्षा स्नेहांकिता


Recent Social Activities Performed By Team Snehankita